शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

"जीवन संघर्ष " चे प्रकाशन.

     माझे आत्मचरित्र ' जीवन संघर्ष ' चे नुकतेच प्रकाशन झाले. प्रकाशनास  साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

लता दीदींचे " नमो नमः "

दि. १ नोव्हेंबर २०१३ रोजी पुणे येथे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उदघाटन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. समारंभास मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. दिनानाथ मंगेशकर यांनी पूर्वी संगीत नाट्यक्षेत्र गाजविले; आणि त्यांच्या नंतर त्यांच्या मुली लता, आशा, उषा, मीना, मुलगा हृदयनाथ यांनी ती परंपरा पुढे चालविली. लता आणि आशा  या तर गायन क्षेत्रात शिखरावर आरूढ झाल्या. देशातच नाही तर जागतिक पातळीवर त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले. लताचा आवाज म्हणजे साक्षात परमेश्वराची पूजा. त्यांचे साधे बोलणे, तो आवाज काळजाला भिडतो. त्यांचे बोलणे सुद्धा ऐकत राहावे असे वाटते. त्या भारताच्या " भारत रत्न " आहेतच; पण " गानकोकिळा " सुद्धा आहेत. आशा भोसले यांचा आवाज म्हणजे अष्टपैलू . भक्ती, प्रेम, गझल, मुजरा, पाश्चात्य संगीत इ. सर्व क्षेत्रात तितक्याच ताकदीने फिरणारा. त्यांचे जीवनही तसेच. रसिकतेने जगणं, राहणं, उपभोगणं हे त्याचं वैशिष्ट्य. लता म्हणजे मीरा; आशा म्हणजे  ' आशा ' च. आजही आशांना स्टेजवर गाणे गात थिरकताना पाहिले म्हणजे नवल वाटते. त्या गाणे गातात आणि जगतातही.
     मंगेशकर कुटुंबाचे कार्य गायन क्षेत्रात आहेच; आणि सामाजिक क्षेत्रात ही आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे त्याचे प्रत्यक्ष स्वरूप. त्याच्या उदघाटनासाठी नरेंद्र मोदी यांना बोलावणे म्हणजे लता आणि त्यांच्या कुटुंबीयाजवळ प्रांतवाद आणि पक्षवाद नाही हे दिसून येते. माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या समोर ' ऐ मेरे वतन के लोगो..' गायले. नंतर राज्यसभेचे खासदार पदही स्वीकारले. आणि आता नरेंद्र मोदी  यांना पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ त्यांनी राजकारणात प्रवेश केला असा होत नाही. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पूर्वी जे विचार असतील तेच आज असायला पाहिजेत असे नाही. काळ, वेळ, परिस्थिती पाहून विचार बदलू शकतात. त्यात वावगे असे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. भारतात लोकशाही असल्यामुळे कोणताही एक पक्षच नेहमीसाठी सत्तेवर राहावा असे नाही; आणि ते शक्यही नाही. यापूर्वी सुद्धा अनेक पक्ष सत्तेवर आलेले आहेत. आत्तासुद्धा अनेक राज्यात वेगवेगळे पक्ष सत्तेवर आहेत. मोदींनी गुजरात मध्ये जे विकासाचे काम करून दाखविले; त्यामुळे आज जनमत त्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. कोणी काहीही प्रचार केला; तरी भारतीय जनता सर्व जाणते; आणि वेळप्रसंगी आपला निर्णय देते. त्यामुळेच मोरारजी देसाई, गुजराल, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी आदि पंतप्रधान होऊ शकले. आणीबाणी नंतर इंदिरा गांधींना जावे लागले. मोरारजी देसाई आले; पण त्यांच्या सरकारच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते सरकार गेले; आणि पुन्हा इंदिरा गांधीचे सरकार सत्तेवर आले. म्हणून आज जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत असेल; तर ते नक्कीच होतील.
     लता, आशा, मीना, उषा, हृदयनाथ या मंगेशकर कुटुंबीयांनी ' दिनानाथ मंगेशकर  रुग्णालय ' सुरु करून रुग्णांसाठी मोठी सोय केली; त्याबद्दल त्यांना धन्यवाद.