गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

अधांतरी ...

     महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ जाहीर झाल्यापासून राजकारणाचे खेळ जनता पाहत होती. आघाडी फुटली, युती तुटली. शेवटपर्यंत चर्चा, वाटाघाटी चालू होत्या. शेवटी आपापली ताकत स्वतंत्रपणे अजमावली. फार पूर्वीपासून प्रत्येकाची अशीच इच्छा होती. प्रचारात एकमेकांची उणीदुणी, टीका इ. सर्व प्रकार झाले. नको त्या थराला जाऊन जहरी टीकासुद्धा झाली. बहुमताचे दावे, प्रतिदावे झाले; पण जनतेने कौल दिला; आणि कुणालाही बहुमत मिळाले नाही. सत्तेसाठी चर्चा, भेटीगाठी सुरु झाल्या. मानपान, सन्मान आडवे येऊ लागले...
     पूर्वी खेड्यांमध्ये शेतीविषयी, घरांविषयी आपसात भांडणे चालायची. पिढ्यानपिढ्या कोर्टात दावे चालायचे. वादी आणि प्रतिवादी कर्जबाजारी व्हायचे. शेत विकायची वेळ यायची; पण कोणीही माघार घेण्यास तयार व्हायचे नाहीत. प्रत्येकाचा बाणा असे, "शेत गेले तरी हरकत नाही; पण धुरा जाऊ द्यायचा नाही." "मोडेल पण वाकायचे नाही." अशा प्रकारात पिढी दरपिढी दुष्मनी चालू राहायची. यातून फलित एवढेच निघायचे, की दोन्ही पक्ष कंगाल व्हायचे.
     काळ बदलला, शिक्षणाच्या सोयी झाल्या. शिक्षितांचे प्रमाण वाढले. विचारांत फरक पडला. पूर्वीसारखे कज्जे कमी झाले; पण राजकारण सुरु झाले. सत्तेसाठी स्पर्धा वाढली. स्वार्थ वाढला. गमावण्यापेक्षा कमावणे वाढले. कोणत्याही पद्धतीने, प्रकाराने; मग भ्रष्टाचारच शिष्टाचार झाला. तो वरपासून खालपर्यंत भिनला. त्यात कुणालाही वैषम्य वाटेनासे झाले. तत्वे, प्रामाणिकपणा, बांधिलकी लयाला गेली. जिकडे तिकडे एकच काम सुरु झाले, "भर अब्दुल्ला गुड थैली में."
     जनता हे सर्व पाहत होती. आज ना उद्या फरक पडेल; असा एखादा दूत येईल, की जो, ही परिस्थिती बदलून टाकील. कमीतकमी आपल्या राहण्या-खाण्याची, कपड्या-लत्त्याची, दवापाणी-शिक्षणाची, रोजगाराची  सोय करील. दुष्काळ, शेतीची नापिकी, कर्जबाजारीपणा इ. मुळे आत्महत्त्या करायची वेळ येणार नाही. पण दुर्दैव, आला दिवस जात होता, रोज सूर्य उगवत होता; पण भोग संपत नव्हते. आत्महत्त्या चालूच आहेत, स्त्रियांवरील अत्त्याचार चालूच आहेत, दलितांचे, शोषितांचे  हत्त्याकांड चालूच आहे. पण इकडे लक्ष देण्यास कोणास वेळ नाही. प्रत्येकजण आपल्या खेळात मश्गुल आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून...
    




शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

"जीवन संघर्ष " चे प्रकाशन.

     माझे आत्मचरित्र ' जीवन संघर्ष ' चे नुकतेच प्रकाशन झाले. प्रकाशनास  साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

लता दीदींचे " नमो नमः "

दि. १ नोव्हेंबर २०१३ रोजी पुणे येथे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे उदघाटन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. समारंभास मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. दिनानाथ मंगेशकर यांनी पूर्वी संगीत नाट्यक्षेत्र गाजविले; आणि त्यांच्या नंतर त्यांच्या मुली लता, आशा, उषा, मीना, मुलगा हृदयनाथ यांनी ती परंपरा पुढे चालविली. लता आणि आशा  या तर गायन क्षेत्रात शिखरावर आरूढ झाल्या. देशातच नाही तर जागतिक पातळीवर त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले. लताचा आवाज म्हणजे साक्षात परमेश्वराची पूजा. त्यांचे साधे बोलणे, तो आवाज काळजाला भिडतो. त्यांचे बोलणे सुद्धा ऐकत राहावे असे वाटते. त्या भारताच्या " भारत रत्न " आहेतच; पण " गानकोकिळा " सुद्धा आहेत. आशा भोसले यांचा आवाज म्हणजे अष्टपैलू . भक्ती, प्रेम, गझल, मुजरा, पाश्चात्य संगीत इ. सर्व क्षेत्रात तितक्याच ताकदीने फिरणारा. त्यांचे जीवनही तसेच. रसिकतेने जगणं, राहणं, उपभोगणं हे त्याचं वैशिष्ट्य. लता म्हणजे मीरा; आशा म्हणजे  ' आशा ' च. आजही आशांना स्टेजवर गाणे गात थिरकताना पाहिले म्हणजे नवल वाटते. त्या गाणे गातात आणि जगतातही.
     मंगेशकर कुटुंबाचे कार्य गायन क्षेत्रात आहेच; आणि सामाजिक क्षेत्रात ही आहे. दिनानाथ मंगेशकर रुग्णालय म्हणजे त्याचे प्रत्यक्ष स्वरूप. त्याच्या उदघाटनासाठी नरेंद्र मोदी यांना बोलावणे म्हणजे लता आणि त्यांच्या कुटुंबीयाजवळ प्रांतवाद आणि पक्षवाद नाही हे दिसून येते. माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या समोर ' ऐ मेरे वतन के लोगो..' गायले. नंतर राज्यसभेचे खासदार पदही स्वीकारले. आणि आता नरेंद्र मोदी  यांना पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा दिल्या. याचा अर्थ त्यांनी राजकारणात प्रवेश केला असा होत नाही. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पूर्वी जे विचार असतील तेच आज असायला पाहिजेत असे नाही. काळ, वेळ, परिस्थिती पाहून विचार बदलू शकतात. त्यात वावगे असे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली. भारतात लोकशाही असल्यामुळे कोणताही एक पक्षच नेहमीसाठी सत्तेवर राहावा असे नाही; आणि ते शक्यही नाही. यापूर्वी सुद्धा अनेक पक्ष सत्तेवर आलेले आहेत. आत्तासुद्धा अनेक राज्यात वेगवेगळे पक्ष सत्तेवर आहेत. मोदींनी गुजरात मध्ये जे विकासाचे काम करून दाखविले; त्यामुळे आज जनमत त्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. कोणी काहीही प्रचार केला; तरी भारतीय जनता सर्व जाणते; आणि वेळप्रसंगी आपला निर्णय देते. त्यामुळेच मोरारजी देसाई, गुजराल, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी आदि पंतप्रधान होऊ शकले. आणीबाणी नंतर इंदिरा गांधींना जावे लागले. मोरारजी देसाई आले; पण त्यांच्या सरकारच्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे ते सरकार गेले; आणि पुन्हा इंदिरा गांधीचे सरकार सत्तेवर आले. म्हणून आज जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत असेल; तर ते नक्कीच होतील.
     लता, आशा, मीना, उषा, हृदयनाथ या मंगेशकर कुटुंबीयांनी ' दिनानाथ मंगेशकर  रुग्णालय ' सुरु करून रुग्णांसाठी मोठी सोय केली; त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
    

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

पांच राज्यातील विधानसभा निवडणुका.

परवाच पांच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. डिसेंबर २०१३ मध्ये निकाल घोषित होतील. ही २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम असेल. जनमत कोणत्या बाजूला आहे याची कल्पना येईल. म्हणून या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे महत्व आहे. तसेच मोदी यांचा कस लागणार आहे. काँग्रेस की भाजपा याचा अंदाज येऊ शकेल. म्हणून या पांच राज्यातील निवडणुका महत्वाच्या आहेत. येत्या डिसेंबर मध्ये चित्र स्पष्ट होईलच.

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

निवडणूक २०१४

निवडणूक २०१४  जवळ येत आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. त्यापैकी भा.ज.पा. सर्वात पुढे असल्याचे दिसून येते. त्या पक्षाने पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांची घोषणा करून आघाडी घेतली आहे. आता यापुढे सर्व पक्षांची हालचाल सुरु होईल. परंतु जनता अशा पक्षामागे जाईल, जो महागाई, भ्रष्टाचार, बलात्कार , दहशतवाद इ. विषयांना पायबंद घालील. हे सर्व करण्यासाठी सध्या मोदी लोकांसमोर आहेत. असे असलेतरी २०१४ ची निवडणूकच ठरवेल कोण सत्तेवर येणार. तसेच कोण जनतेची अपेक्षा पूर्ण करणार?